Karnataka Assembly Election 2018: 'या' दहा जागा उघडतील विधानसभेचं दार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 01:04 PM2018-05-13T13:04:31+5:302018-05-13T19:23:17+5:30
कर्नाटकमधील दहा जागांकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे
बंगळुरु: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान अखेर काल पार पडले. गेल्या सहा महिन्यांपासून यासाठी आरोप प्रत्यारोप, प्रचार सुरु होता. आता कर्नाटकातील मतदारांनी आपला कौल नक्की कोणत्या पक्षाला दिला आणि एक्झिट पोलनुसार जनता दल सेक्युलर खरेच किंगमेकरच्या भूमिकेत जाणार का, हे पाहावे लागेल. मंगळवारी १५ मे रोजी हे सर्व चित्र स्पष्ट होईल. पण त्यादिवशी खरे लक्ष पुढील मतदारसंघांकडेच असेल. या जागा कर्नाटक विधानसभेसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत.
१) बदामी- बदामी ही जागा या विधानसभेसाठी अत्यंत चर्चेत राहिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दक्षिण कर्नाटकसह उत्तर कर्नाटकात या जागेवरुन लढण्याचा निर्णय घेतला. बागलकोट जिल्ह्यातील या जागेवर भाजपाने बी श्रीरामलू यांना तिकीट दिले आहे. २०13 साली येथे काँग्रेसचे चिम्मनकल्टी बायप्पा भिमाप्पा विजयी झाले होते, तर जदधचे महंतेश गुरुपादप्पा ममदापूर दुसऱ्या क्रमांकावर होते.
२) बिदर - बिदर ही कर्नाटकच्या २८ लोकसभा जागांपैकी एक जागा आहे. २००८ पर्यंत बिदर ही अनुसुचित जातींसाठी राखीव जागा होती. काँग्रेसने २०१३ साली रहिम खान यांना तिकीट दिले तर भाजपाने सूर्यकांत नगमरपल्ली यांना रिंगणात उतरवले. परंतु केजेपी पक्षाचे गुरुपादप्पा नगमरपल्ली येथून विजयी झाले. रहिम खान दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
३) बेळगाव ग्रामीण- बेळगाव लोकसभा मतदारसंघात या जागेचा समावेश होतो. गेल्या निवडणुकीत या जागेवर भाजपाचे संजय पाटील विजयी झाले होते. यंदा काँग्रेसतर्फे लक्ष्मी हेब्बाळकर विरुद्ध भाजपाचे संजय पाटील असा सामना होत आहे.
४) बेल्लारी- बेल्लारीतून गेल्या विधानसभेसाठी बी श्रीरामलू विजयी झाले होते आता भाजपातर्फे एस. पकिरप्पा निवडणूक लढवत आहेत. ही जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे
५) चित्रदुर्ग- ही जागा अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. भाजपाने जी. एच. थिप्पारेड्डी तर काँग्रेसने एच ए षण्मुखप्पा यांना तिकीट दिले आहे. गेल्या निवडणुकीत थिप्पारेड्डी यांनी जदधच्या बसवराजन यांना पराभूत केले होते.
६) भटकळ- उत्तर कन्नड जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची जागा आहे. दहशतवादी रियाज व यासिन भटकळ यांच्यामुळे हे गाव चर्चेत आले. येथे आता भाजपातर्फे सुनील नाईक व काँग्रेसतर्फे मनकल वैद्य रिंगणात आहेत.
७) हुबळी-धारवाड पूर्व- ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. काँग्रेसचे प्रसाद अब्बय्या आणि भाजपाचे चंद्रशेखर गोकाक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्या निवडणुकीत अब्बया यांनी भाजपाचे वीरभद्रप्पा हलहारवी यांचा पराभव करुन विधानसभेत प्रवेश केला होता. आता ते पुन्हा यशस्वी होतात का, हे पाहाणे गरजेचे आहे.
८) उडुपी- किनारवर्ती प्रदेशातील ही एक महत्त्वाची जागा आहे. या निवडणुकीत काँग्रेसने या जागेवर प्रमोद मध्वराज तर भाजपाने के. रघुपती भट यांना तिकीट दिले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मध्वराज यांनी भाजपाच्या सुधाकर शेट्टी यांचा पराभव केला होता.
९) राजराजेश्वरीनगर- येथे चार लाखांहून जास्त मतदार आहेत. २०१३ साली येथे काँग्रेसचे मुनीरत्न विजयी झाले होते. त्यांनी जदसे उमेदवाराचा पराभव केला होता. आता त्यांना भाजपाचे मुनीराजा गौडा पीएम आव्हान देत आहेत. याच विधानसभा मतदारसंघात खोटी मतदान ओळखपत्रे सापडली आहेत.
१०) शिकारीपुरा- भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडीयुरप्पा यांचा हा मतदारसंघ. १९८३ पासून त्यांनी येथे सात निवडणुका जिंकल्या आहेत. केवळ १९९९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. येडीयुरप्पा यांच्याविरोधात काँग्रेसने जीबी मालतेशा यांना तिकीट दिले आहे. येडीयुरप्पा यांच्यासाठी ही लढत सोपी मानली जात आहे.