भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी, मध्य प्रदेशात आढळले डिकिनसोनिया जीवाश्म
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:21 AM2021-02-16T03:21:30+5:302021-02-16T07:02:31+5:30
Dickinsonia : भीमबेटका समूहातील ऑडिटोरियम गुफेत, जमिनीपासून ११ फूट उंचीवर एका मोठ्या खडकावर १७ इंच लांबीचे एक अंडगोलाकृती जीवाश्म जगभरातील भूवैज्ञानिकांच्या एका चमूला गेल्या वर्षी फेब्रुवारीत आढळले.
नागपूर : मध्य प्रदेशातील भोपाळजवळच्या भीमबेटका गुफांमधील कातळशिल्पांमध्ये सापडलेल्या डिकिनसोनिया जीवाश्मामुळे भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी असावी, असा रोमांचित करणारा नवा अंदाज समोर आला आहे. ऑस्ट्रेलिया, युक्रेन, रशिया व चीननंतर केवळ भारतात डिकिनसोनिया जीवाश्म आढळल्यामुळे भूवैज्ञानिक आनंदित झाले असून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) संस्था त्याचा सखोल अभ्यास हाती घेण्याच्या तयारीत आहे.
भीमबेटका समूहातील ऑडिटोरियम गुफेत, जमिनीपासून ११ फूट उंचीवर एका मोठ्या खडकावर १७ इंच लांबीचे एक अंडगोलाकृती जीवाश्म जगभरातील भूवैज्ञानिकांच्या एका चमूला गेल्या वर्षी फेब्रुवारीत आढळले.
जीएसआयचे संचालक रणजीत खंगर व मेराजुद्दीन खान, अमेरिकेतील ग्रेगरी रेटालॅक व नेफ्री मॅथ्यूज, दक्षिण आफ्रिकेतील शरद मास्टर यांनी हे जीवाश्म शोधले. केवळ छायाचित्रावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे संशोधन नुकतेच ‘गोंडवाना रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाल्यानंतर त्यावर जगभर चर्चा सुरू आहे.
भीमबेटकाचेही आयुष्य वाढले
भीमबेटका गुफा भोपाळच्या आग्नेयेला ४५ किलोमीटरवर आंतराष्ट्रीय वारसास्थळ असून, माणसे, पशुपक्षी, प्राण्यांपासून ते दहा हजार वर्षांपूर्वीच्या लोकजीवनाचे दर्शन होते.अश्मयुगाच्याच विविध टप्प्यांवर ती चित्रे रेखाटण्यात आली असावीत आणि हा कालखंड दहा ते पस्तीस हजार वर्षांपूर्वीचा असावा, असे मानले जाते; पण डिकिनसोनिया जीवाश्माने या वारसास्थळाचे भूशास्त्रीय वय तब्बल ५५ ते ५७ कोटी वर्षांपर्यंत मागे गेले आहे.
अचानक भेटीत लागला शोध
मार्च २०२० मध्ये नवी दिल्लीत होणारी ३६वी आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषद कोरोनामुळे रद्द झाली. ५६ वर्षांनंतर तिचे यजमानपद भारताकडे आले होते. परिषद रद्द झाली, तरी महत्त्वाच्या स्थळांना भेट देताना भूवैज्ञानिकांना भीमबेटका येथे जीवाश्म सापडले. ऑडिटोरियम गुफेकडे संशोधक अचानकच गेले होते, हे विशेष.
बहुपेशीय प्राणिसृष्टीचा पहिला आविष्कार
- डिकिनसोनिया जीवाश्माचे भूविज्ञानात मोठे महत्त्व आहे. पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्यातील बॅक्टेरिया, एकपेशी जीव ते बहुपेशी जीव या प्रवासात हे जीवाश्म हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
- डिकिनसोनियाचा पहिला शोध ऑस्ट्रेलियाचे रेड स्प्रिग यांनी इडियाकारा टेकड्यांमध्ये लावला.
- सुरुवातीला डिकिनसोनिया ही वनस्पती किंवा बुरशीचा प्रकार मानला जात होता. तथापि, त्यात कोलेस्टेरॉल आढळल्याने ताे बहुपेशीय प्राणी होता, हे नंतर स्पष्ट झाले. जीवाश्म सापडलेला भूभाग ८० ते ९० कोटी वर्षे जुन्या भूसंरचना आहे.