मृत्यूनंतरही यातना; रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह गाडीवर बांधून नेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 02:24 PM2022-08-01T14:24:46+5:302022-08-01T14:25:32+5:30
शासकीय रुग्णवाहिका मिळाली नाही, खासगी वाहन चालकाने 5 हजार रुपये मागितले.
भोपाळ: मध्यप्रदेशातील शिवराज सरकार विकासाच्या मोठ्या गोष्टी करताना दिसते. पण, दुसरीकडे गरिबांना मृत्यूनंतरही मोठे हाल सहन करावे लागतात. मध्य प्रदेशातील शहडोल येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एक ह्रदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेहाला नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने मुलाने चक्क मोटारसायकलवरुन मृतदेह नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ टीव्ही-9 हिंदीने शेअर केला आहे.
मध्य प्रदेश: शहडोल के शासकीय अस्पताल और मेडिकल कॉलेज में शव वाहन नहीं मिला. प्राइवेट शव वाहन वाले ने 5 हजार रुपए मांगे. इतने पैसे नहीं थे तो लाचार बेटा मां के शव को मोटरसाइकिल पर बांधकर 80 किलोमीटर दूर ले जाने को मजबूर हो गया. #MadhyaPradesh@ChouhanShivrajpic.twitter.com/his2a9IMqs
— Nitesh Ojha (@niteshojha786) August 1, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, अनुपपूरच्या गोदारू गावातील रहिवासी जयमंत्री यादव यांना छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी शहडोलच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जयमंत्री यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. पण, उपचारादरम्यान दुपारी 2.40 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेह गावाकडे नेण्यासाठी मुलाने शासकीय रुग्णवाहिका मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, शासकीय रुग्णवाहिका मिळाली नाही, यानंतर खासगी वाहनाने मृतदेह नेण्याचे ठरले. खासगी वाहन चालकाने 5 हजार रुपयांची मागणी केली, मुलाकडे पैसे नव्हते. अखेर त्याने आईचा मृतदेह मोटारसायकलवर बांधला आणि 80 किलोमीटरचा प्रवास करुन गावी आला.