- डॉ. खुशालचंद बाहेतीइंदूर - केंद्रीय अन्वेषण विभाग(CBI) ने इंदूर येथील एका आरोपीविरुद्ध ऑस्ट्रेलियास्थित एका अल्पवयीन मुलीचे ऑनलाइन लैंगिक शोषण केले आणि धमकी दिली म्हणुन गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीची ऑस्ट्रेलियातील एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने अल्पवयीन मुलीशी सलगी वाढवली व नंतर तिला, तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास प्रवृत्त केले.
काही काळानंतर जेव्हा अल्पवयीन मुलीने फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास टाळाटाळ सुरु केली , तेव्हा आरोपीने तिला तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना पाठवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. धमकीच्या दबावाखाली तिने कांही दिवस व्हिडीओ आणि फोटो शेअर करणे सुरूच ठेवले. त्यानंतर पीडितेने आरोपीला सोशल मीडियावर ब्लॉक केले. मात्र, आरोपीने पुन्हा तीच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधून तिला धमकावले. यानंतर मात्र पीडितेने ऑस्ट्रेलियात पोलीस तक्रार दाखल केली. यासंदर्भात इंटरपोलकडून सीबीआयला माहिती मिळाली.
आधी ठावठिकाणा शाेधला, मग अटक- सीबीआयने माहीती तंत्रज्ञान कायदा व आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला. भौगोलिक स्थान शोधण्याचे आपले कौशल्य वापरून आरोपीचा नेमका ठावठिकाणा शोधला. यानंतर पुरावे मिळवुन गेल्या आठवड्यात आरोपीचा छडा लावला. - आरोपींच्या घर झडतीत गुन्ह्यातील संगणकाची हार्ड डिस्क, मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त केले. आरोपीला कोर्टाने सीबीआय कोठडी सुनावली आहे.