नवी दिल्लीज्या दिवसाची संपूर्ण देश वाट पाहत होता तो दिवस आज आला. संपूर्ण देशभरात आज जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी एकूण १ लाख ९१ हजार १८१ लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस घेतलेल्यांपैकी एकावरही लस टोचल्यानंतर साइडइफेक्ट किंवा इतर कोणत्या कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे भारतासाठी हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे.
लसीकरणाला शुभारंभ! आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रम, कोरोना योध्दांसाठी पंतप्रधान मोदी भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्त आज देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांना अर्थात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्य दलातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी लोकांना लस देण्याची योजना केंद्राने आखली आहे. कोविड योद्ध्यांच्या लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्राकडून केला जाणार आहे.
आरोग्य मंत्र्यांनीही व्यक्त केला आनंदकोरोनावरील लस या महामारीच्या विरोधात संजीवनी सारखं काम करेल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. "मी अत्यंत आनंदी व समाधानी आहे. आपण गेल्या वर्षभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोनाविरोधातील लढाई लढत आहोत. कोरोनावरील ही लस संजीवनी म्हणून काम करेल. ही लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे", असं आरोग्यमंत्री म्हणाले.