लखनौ - पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी तुलनेने कमी पात्रतेचे काम करण्यासाठीही तयार होत आहेत. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथे शिपायाच्या पदासाठी निघालेल्या 62 जागांसाठी हजारो अर्ज आले आहेत. त्यामधील सुमारे 3 हजार 700 अर्ज तर पीएचडी धारकांनी केले आहेत. शिपाई/संदेशवाहकांच्या पदासाठीची पात्रता केवळ पाचवी पास आहे. मात्र असे असताना उनेक उच्चशिक्षितांनी या पदासाठी अर्ज केला आहे. 62 जागांसाठई एकूण 93 हजार अर्ज आले आहेत. त्यामधील केवळ 7 हजार 400 अर्जदारांचे शिक्षण पाचवी ते 12वीच्या दरम्यान आहे. उर्वरित अर्जधारकांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर तसेच बी. टेक, एम. टेक आणि एमबीए केलेल्या तरुणांचा समावेश आहे. पोलीस खात्यांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिपाई/संदेशवाहकाची 62 पदे गेल्या 12 वर्षांपासून रिक्त आहेत. पोलीस खात्यातील या पदाचे काम पोस्टमनसारखे असते. या पदावरील नियुक्त व्यक्ती पोलिसांसाठी टेलिकॉम डिपार्टमेंटमधून पत्र आणि कागदपत्रे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पोहोचवण्याचे काम करतात. आता पर्यंत निवड करण्यासाठी आम्ही अर्जदारांकडून त्यांना सायकल चालवता येत असल्याचे सत्यापन करून घेत होते. मात्रा यावेळा मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याने आम्हाला नाइलाजाने निवड चाचणी घ्यावी लागणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
शिपायाच्या जागेसाठी तब्बल 3 हजार 700 पीएचडीधारकांनी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 2:04 PM