नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,04,66,595 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,51,160 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशभरातील कोरोना संसर्गाचा वेग थोडा मंदावत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली असून, भारतातही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. नव्या स्ट्रेनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 96 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी देशातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या 96 वर पोहोचली आहे याबाबत माहिती दिली आहे. वेगाने पसरणाऱ्या व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आलेल्या राज्यांमध्ये त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.
भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये देखील कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये परतलं आहे. कुटुंबातील सदस्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. यामध्ये 4 जणांच्या कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंब राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रशासनाकडून चाचण्या केल्या जात आहेत. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानसेवा थांबविली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनाने भारतात पाऊल ठेवले आहे. ब्रिटनमधून 33 हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या.
नव्या स्ट्रेनचा हाहाकार! 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण; "या" देशात परिस्थिती गंभीर
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले असून हाहाकार पाहायला मिळत आहे. 30 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लंडनचे महापौर सादिक खान (London mayor Sadiq Khan) यांनी याबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी झाला नाही तर येत्या काही आठवड्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड्सची टंचाई निर्माण होऊ शकते. ही आणीबाणीची परिस्थिती असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. या व्हायरसनं आम्हाला धोक्याच्या बिंदूजवळ आणून ठेवलं आहे. आता लवकर योग्य पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रीय आरोग्य सेवेवरचा ताण आणखी वाढेल. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू होऊ शकतो" अशी भीती खान यांनी व्यक्त केली आहे.