नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेत विरोधी पक्षांचा सुपडा साफ झाला आहे. अनेक नेत्यांवर डिपॉजिट जप्त होण्याची वेळ आली आहे. भाजपाचे काही उमेदवार पाच लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. मात्र, भाजपाचा एक उमेदवार असा आहे की, जो फक्त 181 मतांनी जिंकला आहे.
उत्तर प्रदेशातील मछली शहर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार भोलानाथ आणि बसपाचे उमेवार त्रिभुवन राम यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. काल मतमोजणी सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत जसजशी आकडेवारी समोर येईल, तसतशी या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. अखेर भाजपाच्या भोलानाथ यांनी आघाडी घेत 181 मतांनी त्रिभुवन राम यांचा पराभव केला.
या निवडणुकीत भाजपाचे उमेदावार भोलानाथ यांना 488397 मते मिळाली. तर बसपा उमेदवार त्रिभुवन राम यांच्या पारड्यात 488216 मते पडली. तर, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या राम चरित्र निषाद यांनी 1.75 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता. याचप्रमाणे, अंदमान निकोबार मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुलदीप राय शर्मा यांनी भाजपाच्या विशाल जॉली यांचा केवळ 1407 मतांनी पराभव केला.
दुसरीकडे, लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहम्मद फैजल यांनी 823 मतांना काँग्रेसचे उमेदवार हमदुल्ला सईद यांच्यावर मात केली. झारखंडमधील खुंटी मतदारसंघात भाजपाच्या अर्जुन मुंडा यांनी काँग्रेसचे कालीचर मुंडा यांचा 1145 मतांनी पराभव केला. याशिवाय, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशा कमी फरकाने उमेदवार जिंकले आहेत. येथील आरामबाम मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे अफरीन अली 1142 मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या तपन कुमार रॉय यांचा पराभव केला.