नवी दिल्ली : २0१२ ते २0१४ या तीन वर्षांच्या काळात भारताला पर्यटनातून विदेशी चलनाच्या रूपाने ३,२२,२४१ कोटी रुपये मिळाले. पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी लोकसभेत ही माहिती दिली.कीर्ती आझाद आणि कमला देवी पाटले यांनी या संबंधीचा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना शर्मा यांनी सांगितले की, २0१२, २0१३ आणि २0१४ या तीन वर्षांत पर्यटनातून अनुक्रमे ९४,४८७ कोटी, १,0७,६७१ कोटी आणि १,२0,0८३ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळाले. टुरिझम सॅटेलाईट अकाउंट आॅफ इंडियाच्या अंदाजानुसार, पर्यटन क्षेत्राकडून मिळालेल्या रोजगाराचे आकडे २0१0-११, २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षांत अनुक्रमे ५.७९ कोटी, ६.२0 कोटी आणि ६.६९ कोटी असे होते. शर्मा यांनी सांगितले की, पर्यटन स्थळे आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांचे संवर्धन करण्याची जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासनाची आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार इनक्रेडिबल इंडिया ब्रँड लाईनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, आॅनलाईन आणि आउटडोअर मीडियात अभियान चालवीत आहे. याशिवाय ‘भारताला जाणून घ्या’ या विषयावर सेमिनार आणि कार्यशाळांचे आयोजनही केले जाते.
तीन वर्षांत पर्यटनातून मिळाले ३.२२ लाख कोटी
By admin | Published: April 27, 2015 11:05 PM