पणजी : एरवी पावसाच्या आगमनापर्यंत पर्यटकांची गजबज राहणाऱ्या गोव्याचा पर्यटन मोसम यंदा महिनाभर आधीच संपला आहे. पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने बंद झालेली असून देशी पर्यटकांचीही संख्या रोडावली आहे. किनाऱ्यांवर पर्यटकांची तुरळक वर्दळ दिसत असून यामुळे हॉटेल, शॅक व्यवसायाबरोबरच दुकानदारांनाही फटका बसला आहे. राज्यातील आघाडीचे हॉटेल व्यावसायिक व ‘टूर अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा’चे माजी अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी यास दुजोरा देताना सांगितले की, पश्चिम युरोपमधून येणारी चार्टर विमाने मार्चमध्येच बंद झाल्याने इंग्लंड, स्कँडिनेवियन देशांमधील पर्यटक येणे बंद झाले आहे. अवघे काही रशियन पर्यटक राहिले आहेत. महिनाभर आधीच पर्यटन मोसम संपला असून एक-षष्ठांश व्यवसायावर परिणाम झालेला आहे. एप्रिलमध्येच हॉटेलांच्या खोल्या ५५ टक्केही भरणार नाहीत, अशी स्थिती आहे.विमान कंपन्यांनी केलेल्या मनमानी तिकीटवाढीमुळे देशी पर्यटकांची संख्याही रोडावली आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या किनाऱ्यांवर मिळून ४८0 शॅकना परवाने देण्यात आले होते. पण पर्यटक नसल्याने बहुतांश किनाऱ्यांवरील शॅक गुंडाळण्यात आले आहेत. कांदोळी, बागा आदी ठिकाणी मोजकेच शॅक कार्यरत आहेत. दरम्यान, पर्यटन खात्याकडून मात्र वेगळेच चित्र उभे केले जात आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याचा दावा करण्यात येत असून या मोसमात आतापर्यंत ६९३ चार्टर विमानांमधून १ लाख ४५ हजार ८३३ विदेशी पर्यटक आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) पर्यटन महामंडळाचा इन्कारपर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांनी पर्यटकसंख्या घटल्याचे वृत्त फेटाळले. विदेशी पर्यटक आता व्हिसा आॅन अरायव्हल योजनेचा लाभ उठवत आहेत, त्यामुळे सोपस्कारही सुटसुटीत झाले आहेत. हॉटेल्समध्ये खोल्या भरलेल्या आहेत. शॅकवाल्यांनी व्यवसाय गुंडाळल्याचेही वृत्त निराधार असल्याचे ते म्हणाले. एप्रिलमध्येच किनाऱ्यावरील शॅक काढले जातात, असे त्यांनी सांगितले. यावर्षी पर्यटन मोसमात पर्यटकांची संख्या तशी जाणवलीच नाही. नववर्षाचे सुरुवातीचे दोन दिवस वगळता पर्यटकांचा ठणठणपाळ होता.- क्रुझ कार्दोझ, अध्यक्ष, अखिल गोवा शॅकमालक संघटना
गोव्यातील पर्यटनास लागली ओहोटी
By admin | Published: April 15, 2016 2:07 AM