श्रीनगर - कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी कठोर निर्बंध लादण्यात आले होते. आता काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती हळुहळू सामान्य होत असून, काश्मीरमधील राज्य प्रशासनाने पर्यटकांना काश्मीरमध्ये न जाण्यासंदर्भात जारी केलेली सिक्यॉरिटी अॅडव्हायजरी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ऑक्टोबरपासून ही अॅडव्हायजरी मागे घेण्यात येणार असून, त्यानंतर पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात जाण्याची परवानगी मिळणार आहे. कलम 370 हटवण्यापूर्वी तीन दिवस आधी 2 ऑगस्ट रोजी एक सिक्यॉरिटी अॅडव्हायजरी जारी करून पर्यटकांना काश्मीरमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. त्यावेळी दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यकांना शक्य होईल तितक्या लवकर काश्मीर खोरे सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गृहविभागाकडून काश्मीर खोऱ्यामध्ये जाण्यासाठी जारी करण्यात आलेली ट्रॅव्हल अॅडव्हायजरी हटवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश 10 ऑक्टोबरपासून लागू होईल. दरम्यान, काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी सिक्यॉरिटी रिव्ह्यू बैठक घेतली. या बैठकीत सल्लागारांसोबत मुक्य सचिवसुद्धा सहभागी झाले होते. या बैठकीला विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
बंदी हटवली, 10 ऑक्टोबरपासून पर्यटकांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 9:34 AM