नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह अनेक माेठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे संकट वाढले आहे. पावसामुळे त्यात तात्पुरता दिलासा मिळाला असला तरीही धाेका कमी झालेला नाही. खराब आणि विषारी हवेमुळे ‘टाइप-२’ प्रकारचा मधुमेह हाेण्याचा धाेका वाढताे, अशी माहिती एका संशाेधनातून समाेर आली आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत हे संशाेधन करण्यात आले. त्यातून दूषित कण ‘पीएम-२.५’च्या उच्च पातळीची टाइप-२ प्रकारचा मधुमेह वाढण्यामागे भूमिका माेठी असल्याचे आढळले.
कशामुळे वाढताे धाेका ?
वायू प्रदूषणाचे सूक्ष्मकण फुफ्फुसाद्वारे शरिरात प्रवेश करतात. तेथून ते रक्तात जातात आणि त्यामुळे श्वसन व हृदय राेगाची जाेखीम वाढते. यामुळे रक्त शर्करा अनियंत्रित हाेते. हे संशाेधन बीएमजे ओपन डायबेटीज रिसर्च ॲण्ड केअर जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
बाजारपेठ वाढणार
१४० अब्ज डाॅलरपर्यंत जगभरातील मधुमेह औषधांची बाजारपेठ पुढील १० वर्षांत पाेहाेचण्याचा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
हे औषध मधुमेह आणि रक्तदाब करणार नियंत्रित
अमेरिकेच्या ‘एफडीए’ने वजन घटविण्यासाठी वापरले जाणारे औषध ‘झेप बाउंड’ला मान्यता दिली आहे. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. उच्च रक्तदाब, टाइप-२ मधुमेह तसेच उच्च काेलेस्ट्राॅलवरदेखील ते प्रभावी असल्याचे आढळले आहे. हे औषध लवकरच अमेरिकेत उपलब्ध हाेणार आहे. मात्र, ते महाग असू शकते.