नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतप्रदूषणाचे संकट अधिकच गंभीर झाले असून सोमवारी सकाळी दाट विषारी धुक्यामुळे दृष्यमानताही प्रचंड कमी झाली होती. हवेच्या गुणवत्तेचा सरासरी निर्देशांक (एक्यूआय) ४८४ नोंदला गेला. राजधानीत ट्रकच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली असून सार्वजनिक प्रकल्पांची बांधकामे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.
दरम्यान, शहराच्या बहुतांश भागात दृष्यमानता घटली असून सफदरजंग विमानतळावर ही दृष्यमानता अवघी १५० मीटर होती.
कडक नियम, कठोर निर्बंध
- दिल्लीबाहेरील फक्त इलेक्ट्रिक, सीएनजी, बीएस-६ डिझेल वाहनांना प्रवेश.
- बीएस-४ किंवा त्यापेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर प्रवेशासाठी निर्बंध.
- प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये ५० टक्के उपस्थितीवर चालवण्याची शिफारस.
- उर्वरित कर्मचाऱ्यांना घरूनच कामे करण्यास परवानगी देण्याची सूचना.
विमानमार्ग बदलले
- दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरून ११ विमानांचे मार्ग बदलले.
- दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रदूषणाबद्दल केंद्र सरकारला जबाबदार धरले.
- उत्तरेत पाचट जाळण्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याचा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आरोप.
निर्बंधांसाठी तत्काळ पथक नेमा : सर्वोच्च न्यायालय
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात झालेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रॅप-४चे (श्रेणीबद्ध प्रतिसाद कार्ययोजना) निकष काटेकोर लागू करण्यासाठी तातडीने पथक नेमण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४५०च्या आत असला तरीही हे निर्बंध लागू राहतील, असे न्यायालयाने सुनावले.