नवी दिल्ली : कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पंजाब, हरियाणा सीमेवरून आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टरवरून कूच केले. दिल्ली-एनसीआरच्या सीमेवर हजारो शेतकरी ट्रॅक्टरवर बसून आपला निषेध नोंदवत होते. काहीही झाले तरी मागे हटणार नाही, अशा घोषणांनी दिल्लीची सीमा दणाणली होती.
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील निदर्शनाच्या ४३ व्या दिवशीदेखील शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गाझियाबाद, गुरुग्राम, सोनीपत, हुडा सिटी सेंटरपर्यंत ट्रॅक्टरवरून शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. सरकारने कायदे रद्द केले नाहीत तर प्रजासत्ताकदिनी राजपथावर ट्रॅक्टर दिसतील, असा इशारा आंदोलक संघटनांचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी दिला.
सकाळी अकरा वाजेपासून सिंधू, टिकरी, गाझीपूर, शाहजहांपूर सीमेवरून कुंडली, मानेसर, पलवलच्या दिशेने मोर्चा सुरू झाला. केएमपी एक्स्प्रेस वेवरही ट्रॅक्टर मोर्चा होता. शेतकरी संघटना व केंद्र सरकारमधील बोलणी फिस्कटल्याने आंदोलन अजूनच तीव्र झाले आहे. दोन्ही बाजूंचे सदस्य आता शुक्रवारी चर्चा करतील. शेतकरी संघटना आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात यापूर्वी ४ जानेवारी रोजी आठव्या टप्प्यात झालेली चर्चाही निष्फळ ठरली होती. शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर अडून आहेत, तर सरकारकडून मात्र कायद्यात बदल करण्याची तयारी दर्शवली जातेय.