नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नवस पूर्ण करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात दोन मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी खंडवा जिल्ह्यातील मेरापाणी गावातील लोक हरदा जिल्ह्यातील रोलगाव येथून नवस पूर्ण करून गावाकडे परतत होते.
खिरकीया ते छनेरा दरम्यान धनोरा गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे ती उलटली. या अपघातात तीन महिला आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर प्रवाशांच्या मदतीने जखमींना तातडीने सार्वजनिक आरोग्य केंद्र खिरकीया येथे नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले. 18 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी तीन जखमींना खांडवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
हरदाचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक खिरकियाला पाठवण्यात आले आहे. या अपघातात तीन महिलांसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तर पाच ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात खंडवा जिल्ह्यातील छनेरा पोलीस ठाण्याच्या धनोरा गावाजवळ घडला, मात्र तेथून आरोग्य केंद्र खिरकीया जवळ असल्याने सर्व जखमींना येथे उपचारासाठी आणण्यात आले.
अपघातात राकेश रतिराम, फूलवती राजाराम, अंजली कमल, निशिता रतन, सुंदर मुन्ना, गणेश शंकर, जय सिंह रामसिंह, पतिराम गोगाराम, राजेश रामसिंह, शमोती मंगलसिंह, सीता मंगल सिंह, भगवती भालसिंह, तुलसा गुलाब, श्याम भाई पतिराम, बेटू सुंदर, कुंवरसिंह मंगलसिंह, नानाबाई मोतीराम, केशु भाई रामसिंह हे जखमी झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.