नवी दिल्ली - आजच्या काळात लोकांना स्वतःच्या फायद्याशिवाय कशाचीच पर्वा नाही. लहानसहान कामातही त्यांचा फायदा दिसत नाही तोपर्यंत ते करत नाहीत, अशावेळी कोणी निस्वार्थीपणे गरजूंना मदत केली तर खरच नवल. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. अशाच एका पोलिसाचा फोटो हा सोशल मी़डियावर जोरदार व्हायरल होत आहे. कडाक्याच्या उन्हात एका चिमुकल्याचे पाय भाजत होते. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने मुलासाठी जे काही केलं ते पाहून तुम्हीही त्याचं भरभरून कौतुक कराल.
एका पोलीस कर्मचाऱ्याने भर उन्हात पायाला चटके बसत असलेल्या एका चिमुकल्यावर काही वेळासाठी का होईन पण मायेची फुंकर घातली आहे. @ShyamMeeraSingh ने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने या फोटोला कॅप्शन लिहिले की, 'या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव रणजीत सिंह आहे. दोन मुलं रस्ता ओलांडत होती, सिग्नल बंद होता, मुलांचे पाय भाजत होते. एक लहान मुलगा म्हणाला - सर पाय भाजत आहेत, रोड क्रॉस करून द्या. त्यावर रणजीत यांनी ट्रॅफिक थांबेपर्यंत माझ्या पायावर पाय ठेवं असं म्हटलं. या फोटोमध्ये लहान मुलगा अनवाणी जात असल्याचं दिसून येतं.
ट्रॅफिक कॉन्स्टेबल रणजीत सिंग यांनीही आपल्या फेसबुक अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं – त्या मुलाने माझ्या पायावर पाऊल ठेवताच मला देवाने माझ्या पायावर पाय ठेवल्यासारखे वाटलं, मी चप्पल खरेदी केली आणि त्याला दिली. पण आजची भावना आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील. लोकांना हे खूप आवडले असून त्यांनी रणजीत यांचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.