हैदराबाद: उन्हाळा सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून देशभरातील तापमान सातत्याने वाढत आहे. यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने अगोदरच दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. उन्हाच्या या तीव्र झळांमुळे दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत दिवसभर उन्हात उभे राहून वाहतुकीचे नियमन करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना तर आणखीनच त्रासाला सामोरे जावे लागते. दिवसभर उन्हात उभे राहिल्याने अनेक शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येण्याचा त्रास जाणवू लागणे, साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये प्रशासनाने ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना ताक, ग्लुकोज-डी आणि पाण्याच्या बाटल्या अशा सुविधा पुरवायला सुरूवात केली आहे. वाहतूक विभागाकडून प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांना ताक आणि इतर पेयं पुरवली जात आहेत.आम्ही ड्युटीवर असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ताक पुरवण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय, प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाच्यावेळी पिण्याचे पाणी उपलब्ध होत राहील, याची काळजी घेतली जात आहे. जेणेकरून त्यांना डिहायड्रेशनसारख्या समस्यांचा त्रास जाणवणार नाही, अशी माहिती हैदराबादचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुमार यांनी दिली.
उन्हात ड्युटी बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना प्रशासनाकडून ताक आणि ग्लुकोज-डीचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 10:24 AM