Accident Video: बसच्या धडकेत दुचाकीस्वार चिरडला गेला पण ना बस चालकाने माणुसकी दाखवली ना स्थानिकांमधील कोण मदतीला धावले. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार चिरडला गेला. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. खरे तर ही घटना १९ एप्रिल रोजी घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसच्या बसने दुचाकीवरून जात असलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीला चिरडले. नवीन पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, पटेल जमिनीवर कोसळले आणि बसचा मागचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. विशेष बाब म्हणजे चालकाने बस न थांबवता तिथून पळ काढला. अपघातस्थळी जे घडले ते आणखी धक्कादायक होते कारण एकही प्रवासी पटेल यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही. संबंधित दुचाकीस्वार व्यक्ती रस्त्यावर पडली होती. मात्र वर्दळीच्या चौकातून जाणारी वाहने क्षणभर देखील थांबली नाहीत. शेजारी उभे असलेले लोक अपघातग्रस्ताला मदत करण्यासाठी न थांबता तेथून निघून गेले.
अहमदाबाद येथील या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इथे माणुसकी हरली असे नेटकरी कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओचा दाखला संबंधित बस चालक आणि स्थानिकांना लक्ष्य केले. मदत करायची सोडून तिथून पळ काढणे किती योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला.