चेन्नई: मागील काही दिवसांपासून दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले असून, अनेकांचा मृत्यूही झालाय. यातच मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. वेल्लोर शहरात सकाळी एक घर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणाया दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पद्दुचेरीत मुसळधार पाऊस
हवामान खात्याने चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लुवरसह तामिळनाडूच्या 16 जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नजीकच्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आंध्रमध्ये पुराचा कहर, नद्या-नाले तुडूंब भरले
गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात पुराने कहर केला आहे. पावसामुळे डोंगरावरचे झरे आणि नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तिकडे तिरुपतीच्या प्रसिद्ध मंदिरातही पाणी शिरले आहे. सखल भागातील रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहात वाहने वाहून जात आहेत. तसचे, शहरालगतच्या ग्रामीण भागात आलेल्या पुरात शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. एकूणच नुकसानीचे आकलन करणे कठीण आहे.