देशात चित्ता संगोपन आणि संरक्षणाची मोहिम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतली होती. त्यानुसार, गतवर्षी त्यांच्या जन्मदिनी आफ्रिकेतील नामिबिया येथून नर आणि मादी अशा ८ चित्त्यांचे भारतात आगमन झाले होते. मोठ्या जल्लोषात या वन्य जीवांचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. मात्र, या ८ पैकी एक असलेल्या साशा नामक मादी चित्त्याचे २७ मार्च रोजी निधन झाले. साशा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, तिला किडनीचा त्रास होता हे तपासणीतून समोर आले.
नामिबियातून भारतात आणलेल्या ८ चित्त्यांपैकी साशा ही मादी चित्ता २२ मार्च रोजी एकदम सुस्त पडल्याचे आढळून आले. त्यानंतर, वन विभागातील मॉनिटरींग टीमने तात्काळ क्वारंटाईन करुन तिची तपासणी केली. त्यावेळी, साशाच्या किडनीत संक्रमण असल्याचे समजले. त्यानंतर, तिच्यावर उपचारही सुरू झाले. मात्र, भारतात आणण्यापूर्वीच साशाला किडनीचा विकार होता, हे तपासात समोर आले. दरम्यान, उपचारादरम्यान साशाचा सोमवारी कुनो येथील नॅशनल पार्कमध्येच मृत्यू झाला. दरम्यान, गतवर्षी आणखी १२ चित्त्यांचा ग्रुप भारतात आणण्यात आला, त्यामध्ये, ७ नर आणि ५ मादा चित्ता आहेत. त्यांनाही कुनो येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात ठेवण्यात आलंय.
राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात राहतोय चित्ता
गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडण्यात आले आहेत. हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करत आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जात आहे.