नवी दिल्ली: देशातील अत्याधुनिक रेल्वे गाडी असलेल्या ट्रेन 18 नं नवा विक्रम रचला आहे. संपूर्णपणे देशी बनावटीची ही रेल्वे गाडी आज चाचणी दरम्यान 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावली. त्याआधी पहिल्या चाचणीत ही रेल्वे 160 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं धावली होती. आजची चाचणी यशस्वी झाल्यानं ट्रेन 18 देशातील पहिली सेमी हाय स्पीड ठरली आहे. ट्रेन 18 ची महत्त्वपूर्ण चाचणी आज पार पाडली. यावेळी या गाडीच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आयसीएफचे प्रमुख सुधांशू मनी उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय या ट्रेनची चाचणी पूर्ण झाली. या चाचणीदरम्यान गाडीला जराही झटका बसला नाही. यासोबतच कोणतीही कंपनं जाणवली नाहीत. त्यामुळे ही गाडी 200 किलोमीटर प्रति तास वेगानंदेखील धावू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी हे भारतीय रेल्वे आणि आयसीएफचं मोठं यश मानलं जातं आहे. कोटा ते सवाई माधोपूर या भागात ट्रेन 18 ची चाचणी घेण्यात आली. सध्याच्या घडीला गतीमान एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगानं धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही ट्रेन आग्रा ते दिल्ली दरम्यान धावते. मात्र ट्रेन 18 नं गतीमान एक्स्प्रेसला मागे टाकलं आहे. ट्रेन 18 ची निर्मिती मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली आहे. या ट्रेनची तांत्रिक चाचणी मुरादाबाद ते बरेली दरम्यान घेण्यात आली होती. या चाचणीत ही ट्रेन उत्तीर्ण झाली होती.
देशी बनावटीची हायस्पीड ट्रेन 18 परीक्षेत पास, जाणून घ्या काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:25 PM