गुरुग्राम: सेल्फीचा मोह कधीकधी जीवावर बेतू शकतो. अशाच प्रकारची घटना गुरुग्राम सायबर सिटीमध्ये घडली आहे. ट्रेनसमोर सेल्फी घेण्याच्या नादात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. जीआरपी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनसमोर सेल्फी काढताना तरुणांना भरधाव ट्रेनची धडक बसली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस अधिकारी रामफळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराय रोहिल्लाहून अजमेरला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी 4.48 वाजता गुरुग्राम रेल्वे स्थानकातून निघाली. सायंकाळी 5.15 च्या सुमारास जीआरपीला चार तरुणांचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सध्या जीआरपीने चारही तरुणांचे मृतदेह आणि मोबाईल फोन ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की, तरुणांच्या मृतदेहाचे तुकडे 500 मीटरपर्यंत विखुरलेले दिसले. सध्या अॅक्टिव्हा गाडीच्या क्रमांकावरुन तरुणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. दरम्यान, तिकडे मध्य प्रदेशातील बैतूलमध्येही रेल्वे पुलावर सेल्फी काढण्याची किंमत दोघांना चुकवावी लागली होती. शहापूर येथील रेल्वे पुलाजवळ दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.