Bagmati Express Accident: देशात रेल्वे अपघात होण्याच्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. सातत्याने रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशातच शुक्रवारी तमिळनाडूमध्ये आणखी एका भीषण रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितनाही झालेली नसली तरी १९ जण जखमी झाले आहेत. तमिळनाडूमध्ये दरभंगा बागमती एक्स्प्रेस ट्रेनने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दरभंगा एक्स्प्रेसचे १३ डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर एक्सप्रेसच्या काही डब्यांना आगही लागली. या दुर्घटनेत १९ प्रवासी जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री ८:५० वाजता म्हैसूरहून बिहारमधील दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली. बागमती एक्स्प्रेसने तिरुवल्लूरजवळच्या कवारप्पेट्टई रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. ट्रेन मैसूरवरुन पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती. एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्यानंतर १३ डबे रुळावरुन घसरले. त्यानंतर काही डब्यांनी पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलं. अपघात घडलेल्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका आणि एनडीआरएफच्या तुकड्याही पाठवण्यात आल्या. या अपघातात १९ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी प्रवाशांना ट्रेनमध्ये जोरदार धक्का बसला आणि ती लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. या अपघातात रेल्वेचे १३ डबे रुळावरून घसरले. या अपघातात जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी काही प्रवासी जखमी झाले आहेत. या वर्षी फेब्रुवारी ते जुलैपर्यंत वेगवेगळ्या रेल्वे अपघातांमध्ये डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
दरम्यान, सर्व जखमींवर चेन्नई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच समस्तीपूर रेल्वे विभागातर्फे दरभंगा रेल्वे स्थानकावर रेल्वेतील प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले. याशिवाय टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला. समस्तीपूर रेल्वे विभागाकडून मदत केंद्र उघडण्यात आले आहे. दरभंगा रेल्वे स्थानकावर दोन रेल्वे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. २२ डब्यांच्या या ट्रेनमध्ये स्लिपर क्लासचे ६ डबे, थर्ड एसीचे ६ डबे, सेकंड एसीचे २ डबे, इकॉनॉमिक क्लासचा १ डबा आणि जनरल क्लासचे ३ डबे सोबत पॅन्ट्री कार आणि पॉवर कार होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दरभंगा रेल्वे स्थानकावर एसी आणि स्लीपर क्लासमधून एकूण ३५५ प्रवासी प्रवास करत होते.