केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 06:13 PM2024-11-02T18:13:26+5:302024-11-02T18:16:50+5:30
केरळमध्ये रेल्वे अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Kerala Expres Accident : दक्षिण भारतातील केरळमधील पलक्कड येथे शनिवारी एक भीषण अपघात झाला. केरळमधील पलक्कडजवळ केरळ एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृत सफाई कर्मचारी हे तामिळनाडू येथील रहिवासी होते. पुलावरून चालत असताना केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. तिघांचे मृतदेह हाती लागले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा नदीत शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
तमिळनाडूतील चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. तेवढ्यात केरळ एक्सप्रेस ट्रेन आली. ते वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि रुळांमध्ये अडकले. त्यामुळे रेल्वेची धडक बसल्याने ते नदीत पडले. या अपघातात चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सध्या तिन्ही मृतदेह हाती लागले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वल्ली, राणी, लक्ष्मण आणि आणखी एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत.
चार स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते. त्याचवेळी केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सर्व सफाई कामगार पुलावरून खाली पडले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एका सफाई कामगाराचा मृतदेह सापडलेला नाही. नदीत पडल्यानंतर सफाई कामगाराचा मृतदेह वाहून गेला असावा, अशी भीती व्यक्त व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारी ३.०५ च्या सुमारास नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम ट्रेनने या कर्मचाऱ्यांना धडक दिली. हे सफाई कामगार रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शोरणूर पुलाजवळील रेल्वे रुळावरील कचरा साफ करत होते. या धडकेमुळे साफसफाईच्या कामात गुंतलेले रेल्वे कर्मचारी रुळावरून खाली पडले. रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे. "कर्मचाऱ्यांनी ट्रेन येताना पाहिली नसावी, ज्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे," असे शोरनूर रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील लखनऊ-गोंडा रेल्वे मार्गावरील बहराइचमधील जारवाल रोड पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी मालगाडीची धडक बसून दोन महिलांचा मृत्यू झाला. जारवाल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुकिया गावातील शाहजहान (४२) आणि सलमा (४०) या दोघी रेल्वे रुळ ओलांडून रोजच्या कामासाठी शेतात गेल्या होत्या. परत येताना त्यांनी ट्रेनचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या ट्रॅकच्या मधोमध जाऊन थांबल्या आणि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागली. दरम्यान, ज्या ट्रॅकवर दोघे उभ्या होत्या त्याच ट्रॅकवर दुसरी ट्रेन आली. मालगाडीने धडक दिल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला.