ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २१ - ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची छेड काढणा-या आरोपींना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. महिलेच्या पतीने काही लोक पत्नीची छेड काढत असल्याची तक्रार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरच्या माध्यमातून केली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी लगेच रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. आरपीएफने तात्काळ धनाबाद रेल्वे स्थानकार पोहोचून कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली.
हे दांपत्य अजमेर - सियालदह एक्स्प्रेसने अजमेरहून गयाला जात होते. यावेळी तरुणांचा एक ग्रुप या ट्रेनमध्ये चढला. या तरुणांनी महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. पिडीत महिलेच्या पतीने आणि इतर प्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना नीट वागण्याची तंबीही दिली. पण तरीही हे तरुण ऐकण्यास तयार नव्हते. प्रवाशांनी तिकीट तपासणीस आणि कोच अटेंडंटलादेखील तक्रार केली. मात्र कोणताच रेल्वे अधिकारी मदतीसाठी पुढे आला नाही.
गया रेल्वे स्थानकावर या दांपत्याने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला मात्र या ग्रुपने त्यांना अडवलं. शेवटी महिलेच्या पतीने धनाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच ट्विट करुन तक्रार केली. धनाबाद आरपीएफने कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. आरोपींची चौकशी अगोदरच करण्यात आली आहे अशी माहिती आरपीएफ धनाबादचे अधिकारी बी के मिश्रा यांनी दिली आहे.