नवी दिल्ली - कर्नाटकहून दिल्लीला जाणारी ट्रेन क्र. १२६५० कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसचं अपहरण झाल्याची माहिती आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने ट्रेनचं अपहरण झाल्याचं ट्विट केल्याने प्रशासन सतर्क झाले. रेल्वे स्टाफला सतर्कतेचे आदेश देण्यात आले. अखेर तपास आणि शोध पूर्ण झाल्यावर देखभालीसाठी ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला होता, असं उत्तर रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रवाशाच्या ट्विटवर देण्यात आलं.
कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कृष्णा बेहरा यांनी हे ट्विट केले होते. प्रवासादरम्यान, ट्रेनचा मार्ग बदलला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ट्रेनचं अपहरण झालं असल्याची शंका त्यांच्या मनात आली. त्यांनी ट्रेनचं अपहरण झाल्याचं ट्विट केलं. प्रिय @IRCTCofficial @drmsecunderabad ट्रेन क्रमांक १२६५०चं अपहरण झालं आहे. कृप.ा मदत करा, असं ट्विट त्यांनी केलं. तसेच ते आयआरसीटीसी आणि सिंकंदराबाद विभागाच्या व्यवस्थापकांना टॅग केले.
त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई सुरू केली. आरपीएफला सतर्क करण्यात आले. आरपीएफने काही वेळानंतर उत्तर देत ट्रेनचं अपहरण झालं नसल्याचे सांगितले. तर काझिपेटा आणि बल्लारशाहदरम्यान, काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे, घाबरू नका असे रेल्वेने एका अन्य ट्विटमध्ये सांगितले.
दरम्यान, बेहरा यांच्या ट्विटमुळे चिंतीत असलेल्या युझर्सनी नंतर त्यांच्या ट्विटची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. तर काही जणांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, ट्विटवर येत असलेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे बेहरा यांनी हे ट्विट नंतर डिलीट केले.