रेल्वेत प्रवास करताना प्रवाशांना अगोदरच तिकीट काढावे लागते. ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुकींगचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध आहे. तसेच, रेल्वे स्टेशनवरील आरक्षण तिकीट खिडकीतूनही प्रवाशांना आरक्षित किंवा जनरल तिकिट काढता येते. मात्र, अनेकदा रेल्वे प्रवासात प्रवाशी तिकीट न काढताच प्रवास करताना आढळून येतात. जनरल डब्ब्यात किंवा आरक्षित डब्ब्यातही असे फुकटे प्रवासी पाहायला मिळतात. रेल्वेतील टीसी अशा प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसुल करतात. मात्र, एका टीसीने तिकीट नसलेल्या प्रवाशाला जबर मारहाण केली आहे.
सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रेल्वेतील प्रवाशाला टीसीकडून जबर मारहाण करण्यात येत आहे. तो प्रवासी माझी चूक काय, माझ्याकडे तिकीट नाही असंही नाही.. असे म्हणताना दिसून येत आहे. मात्र, रेल्वेतील टीसीकडून कानशिलात लगावली जाते, तसेच जबर मारहाण केली जात असल्याचं दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ रेल्वेतील एका प्रवाशाने शूट केला आहे. तसेच, हा प्रवासीही टीसीला मारहाणीबद्दल जाब विचारताना दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांना कानशिलात लगावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?, असा प्रश्न राष्ट्रवादीने विचारला आहे.
''आपल्या अधिकारात दहशत निर्माण करणं हे सरकारचं ब्रीदच आहे. आता तेच ब्रीदवाक्य रेल्वेचे टिसी सत्यात आणताना दिसतायत. प्रवाशाकडे तिकिट नाही तर त्याला दंड करा, पण याचा अर्थ तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करणार ? प्रवाशाच्या कानाखाली हाणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?'', असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. त्यासोबत हा व्हिडिही शेअर केला आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडिओ कुठला आहे, आणि कुठल्या प्रवासातील आहे याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, रेल्वे प्रवासात टीसीने प्रवाशांना मारहाण करण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही. प्रवाशांच्या गैरवर्तनाबाबत रेल्वेतील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला बोलावून कारवाई करता येते. तसेच, प्रवाशाकडे तिकीट नसल्यास दंडही करता येतो. मात्र, प्रवाशांना मारहाण करणे संतापजनक आहे.