बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील दरभंगा येथून मुंबईला जात असलेल्या एका प्रवाशामुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवले नसते तर ओडिशामधील बालासोरमध्ये घडलेल्या अपघातासारखा मोठा अपघात घडला असता. मात्र सुदैवाने हा मोठा अपघात टळला.
जयनगरमधून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाणारी पवन एक्स्प्रेस मुझफ्फरपूर येथून निघाली तेव्हा ट्रेनमधून वेगळाच आवाज येऊ लागला. त्याची कल्पना ना ट्रेनच्या ड्रायव्हरला आली, ना ट्रेनच्या गार्डला कळलं. मात्र ट्रेनमधील एस ११ डब्यातून प्रवास करणाऱ्या दरभंगा येथील राजेश दास यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. मात्र काही समजण्यापूर्वी ट्रेन भगवानपूर स्टेशनपर्यंत पोहोचली होती. ट्रेन थांबताच राजेश यांनी ट्रेनखाली वाकून पाहिले. तेव्हा एस ११ डब्याखालील ट्रेनचं चाक सुमारे १० इंचांपर्यंत तुटलेलं आढळलं. ते याबाबत ड्रायव्हरला काही सांगण्यापूर्वीच ट्रेन पुन्हा सुरू झाली.
मात्र राजेश यांनी घटनेची माहिती इतर प्रवाशांना दिली. तसेच चेन खेचण्यासाठी आग्रह केली. त्यानंतर एका प्रवासाने ट्रेन खेचली. ट्रेन थांबली. तेव्हा ट्रेनचं चाक तुटल्याची माहिती ट्रेनचा ड्रायव्हर आणि आपल्या कर्मचाऱ्यांना दिली. ही ट्रेन भगवानपूर येथे सहा वाजून १० मिनिटांनी थांबली होती. त्यानंतर सोनपूर रेल्वे मंडळातून तज्ज्ञांचं पथक अतिरिक्त डबा घेऊन आले. त्यानंतर सुमारे पाच तासांनंतर रात्री ११.२० मिनिटांनी ट्रेन रवाना करण्यात आली. ट्रेन रवाना होताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.