नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या कौशल विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ११.६३ लाख जणांना प्रशिक्षण दिले गेले आहे. रोजगाराला प्रोत्साहन देणारी ही योजना आहे.
कौशल विकास आणि उद्यमशीलता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेत (पीएमकेव्हीवाय) प्रशिक्षण केंद्रांची स्थापना अनिवार्य नाही. परंतु, सूचीबद्ध केंद्रांच्या माध्यमातूनच प्रशिक्षण दिले जाते. १० जुलैपर्यंत मराठवाडा आणि विदर्भासह महाराष्ट्रात पीएमकेव्हीवायअंतर्गत १,६६४ केंद्रांना सूचीबद्ध केले गेले होते.
प्रधान यांनी सांगितले की, देशात प्रत्येक जिल्ह्यात आदर्श आणि आकांक्षीय कौशल विकास केंद्रांच्या स्थापनेला प्रोत्साहित केले जाते. शिवसेनेचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना प्रधान यांनी लोकसभेत सांगितले की, योजनेअंतर्गत मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात ३६ जिल्ह्यांत ३० जूनपर्यंत ४४ प्रधानमंत्री कौशल केंद्रांचीही स्थापना केली गेली. कौशल विकास योजनांअंतर्गत खासगी संस्थांमध्ये दिले जात असलेल्या प्रशिक्षणाबाबत धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यात ११.६३ लाख उमेदवारांना योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले गेले, असे म्हटले.
मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार राज्यात सर्वात जास्त प्रशिक्षण केंद्र पुणे (२१८), नागपूर (१३६), मुंबई (११४), अहमदनगर (१११) आणि नाशिकमध्ये (१०४) चालवले जात आहेत. वाशिम (७), रत्नागिरी (११), सिंधुदुर्ग (१४), पालघर (१४), कोल्हापूर (७३), जळगाव (५४), लातूर (५३), नांदेड (४८) आणि वर्धा (१८) येथेही ही केंद्रे आहेत.