रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात नक्षल्यांजवळील एक चित्रफीत पोलिसांनी हस्तगत केली असून तीत नक्षल्यांना हेलिकॉप्टर पाडण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्याचे नक्षल प्रकरणांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर.के. विज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुकमा जिल्ह्णातील जंगलामध्ये ही चित्रफित हस्तगत केली आहे. तीत मशीनगनने बनावट हेलिकॉप्टर पाडण्याचा सराव करताना नक्षली दिसत आहेत. यात प्लास्टिक व लाकडाने बनवलेले हेलिकॉप्टर झाडावर उंच ठिकाणी बांधून त्याला आपले लक्ष्य बनवून पाडण्याचा सराव केला जात असलेला चित्रित झाला आहे. आपल्या शस्त्रांनी हेलिकॉप्टरला कसे पाडायचे याची माहिती दिली जात असल्याचेही दिसत आहे. हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या वेळी अथवा खाली उतरण्याच्या वेळी त्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न करतात. तसेच खाली उतरविताना त्याची दिशाभूल करण्यासाठी धुराचाही वापर करीत असतात. मात्र आतापर्यंत त्यांच्या अशा कारवायांमध्ये ते अपयशी ठरले आहेत. नक्षल्यांच्या या सरावाची बातमी याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाला मिळाली होती. मात्र या प्रथमच हाती लागलेल्या अशा चित्रफितीने तिची सत्यता स्पष्ट केली आहे असे विज पुढे म्हणाले. या माहितीनंतर या भागातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून सर्व हेलिपॅड््सवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. या भागात नक्षली हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने केला जात असतो. (वृत्तसंस्था)
नक्षल्यांना हेलिकॉप्टर पाडण्याचे प्रशिक्षण
By admin | Published: January 10, 2015 12:17 AM