नवी दिल्ली - रेल्वेने अनेकदा लांबपल्ल्याचा प्रवास करताना टिकीट बुकिंग केलं जातं. मात्र हवी असलेली सीट मिळाली नाही तर अनेकाचा हिरमोड होतो. तसेच कधी कधी जनरल डब्यातून प्रवास केल्यास सीटसाठी धक्काबुक्की, मारामारी असेही प्रकार घडतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण यासर्व गोष्टींपासून प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करण्यासाठी लवकरच बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता इतर ट्रेनमध्ये देखील बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाल्यानंतर बायोमॅट्रीक मशीनचा वापर केल्यानंतर प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवाशांचा प्रवास उत्तम व्हावा यासाठी महत्त्वाच्या निर्णय घेण्यात येतील असं सांगितलं होतं. बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यानंतर आता आणखी काही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बायोमॅट्रीक सुविधा लागू करण्याची तयारी केली जात आहे. गर्दीमुळे काही चुकीचे प्रकार होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशिनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर सीट बूक होणार आहे.
बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाने सीट बूक केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ उभं राहण्याची गरज नाही. जेव्हा ट्रेनची वेळ होईल तेव्हा प्लॅटफॉर्मवर पोहोचा. त्यानंतर बोटाचे ठसे मॅच करा आणि प्रवास करा. यामुळे सीटसाठी होणारी भांडणं कमी होणार आहेत. डब्याची क्षमता जितकी असेल तितकेच फिंगर प्रिंट मशीन घेणार आहे. उशीरा येणारे प्रवाशी देखील प्रवास करू शकणार आहेत मात्र त्यांना बसण्यासाठी सीट मिळणार नाही.