'महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही', काँग्रेस मंत्र्याचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 01:24 PM2019-12-31T13:24:02+5:302019-12-31T13:24:41+5:30
उद्धवा अजब तुझे सरकार... देशद्रोही आता देशभक्त झाले आहेत. सन 2015 च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री
मुंबई - ठाकरे सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामध्ये काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनीही मंत्री आणि गोपनियतेची शपथ घेतली. मात्र, अस्लम शेख यांच्या शपथविधीवरुन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. आता, मंत्री अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला थेट दिल्लीतून उत्तर दिलंय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेत्यांनाच देशद्रोही म्हटलंय.
भाजपा खासदार किरीट सोमैय्या यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत, उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणत अस्लम शेख यांच्या मंत्रीपदावरुन टोला लगावला. 'देशद्रोही आता देशभक्त झाले... उद्धवा, अजब तुझे सरकार' असं सोमय्यांनी म्हटलं.
उद्धवा अजब तुझे सरकार... देशद्रोही आता देशभक्त झाले आहेत. सन 2015 च्या अधिवेशनावेळी सध्याचे मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांनी 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन स्थगित केलं होतं, अस्लम शेखला देशद्रोही असंही म्हटलं होतं. मात्र, आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री बनले आहेत, असे म्हणत सोमैय्या यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता, अस्लम शेख यांनी किरीट सोमैय्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर दिले. महात्मा गांधींना ठार मारणारे हेच देशद्रोही आहेत, असे म्हणत किरीट सोमैय्यांच्या टीकेला अस्लम यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच, मला मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने यांच्या पोटात दु:खत आहे. हे महात्मा गांधींना ठार मारणारे लोकं आहेत, हेच नथुराम गोडसेंचं मंदिर उभारणारे भाजपावाले आहेत, असे म्हणत अस्लम शेख यांनी किरीट सोमैय्यांच्या टीकेला उत्तर दिलंय.