हरिश गुप्ता -
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांच्याकडील विधि खाते काढून त्यांना पृथ्वी विज्ञान खात्याची जबाबदारी देण्याचा तसेच विधि खाते अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपविण्याचा काहीसा धक्कादायक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. गुरुवारी पहाटे हा निर्णय जाहीर करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) जबाबदारी सांभाळणारे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडून पृथ्वी विज्ञान खाते काढून घेण्यात आले. केंद्रीय विधि खात्याचे राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांच्याकडून ते खाते काढून त्यांना आरोग्य खात्याचा भार सोपविण्यात आला आहे. न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या अधिकारांवर न्याययंत्रणेने आक्रमण केल्याचा दावा करून किरेन रिजिजू यांनी अनेकदा जाहीर टीका केली होती. यंदाच्या वर्षी विविध राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. न्याययंत्रणांबाबत झालेल्या वादांबाबत केंद्र सरकार चिंतित आहे.
न्यायालयाचे निकाल अन् धक्के -- विधिमंत्री हा केंद्र सरकार व न्याययंत्रणा यांना जोडणारा दुवा असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि किरण रिजिजू यांच्यातील संवाद बंद झाला होता, अशी सूत्रांनी माहिती दिली. - दिल्लीतील आप सरकार व नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातील वादाच्या खटल्याचा न्यायालयाने दिलेला निकाल सरकारसाठी धक्का होता. - शिंदे गट-भाजप यांच्या सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते.