नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटविण्यात आले. यानंतर आलोक वर्मा यांनी गुरुवारी रात्री उशिरा केवळ एका व्यक्तीने केलेल्या खोट्या, निराधार आरोपांमुळे मला पदावरून हटविण्यात आल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितले.
भ्रष्टाचारांच्या मोठ्या प्रकरणांची चौकशी करणारी महत्वाची संस्था असल्यामुळे सीबीआयची स्वतंत्रता सुरक्षित आणि संरक्षित ठेवली पाहिजे. कोणत्याही बाहेरच्या दबावाशिवाय सीबीआयचे काम चालले पाहिजे. ज्यावेळी मी सीबीआयचा प्रामाणिकपणा कायम जपण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रामाणिकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे आलोक वर्मा यांनी म्हटले आहे.
(आलोक वर्मांना हटविण्यास मल्लिकार्जुन खरगेंचा विरोध)
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सीबीआयच्या संचालक पदावरुन आलोक वर्मा यांना हटविण्यात आले. या निवड समितीमध्ये असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आलोक वर्मा यांना पदावरुन हटविण्यास विरोध दर्शविला. मात्र, तीन सदस्य असलेल्या या निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ए. के. सीकरी यांनी आलोक वर्मांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब केले. या निर्णयानंतर आलोक वर्मा आता होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि अग्निशमन सेवा महासंचालक म्हणून काम सांभाळणार आहेत. तर, एम. नागेश्वर राव पुन्हा एकदा सीबीआयचे अंतरिम संचालक म्हणून नेमण्यात आले आहे.