पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले असून ते पुढील २४ तासात गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला मध्यरात्री ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे दीव ते पोरबंदन दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातमधील जुनागड, गीर, सोमनाथ, अमरेली, भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बोताद, पोरबंदर, राजकोट या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा धोका आहे. येथे ६ नोव्हेंबरला अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच भावनगर, सुरत, भरुच, आनंद, अहमदाबाद, बडोदा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ७ नोव्हेंबरला अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, नाशिक या ५ जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, महा चक्रीवादळाचे रुपांतर आता अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाले असून सध्या ते गुजराममधील वेरावळपासून ६८० किमी तर, दीव पासून ७३० किमी दूर आहे. ५नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. ५ नोव्हेंबरला सकाळी या चक्रीवादळाची दिशा बदलून ते गुुजरात किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यावेळी चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग हा ताशी सर्वाधिक २१० किमी इतका असू शकेल. त्यानंतर त्यांची तीव्रता पुढील १८ तासात कमी होत जाईल. गुजरात किनारपट्टीला ७ नोव्हेंबरला जेव्हा हे चक्रीवादळ धडकेल, त्यावेळी त्याची तीव्रता कमी झालेली असून तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी ९० ते १०० किमी इतका कमी झालेले असू शकतो. महाराष्ट्र व गुजरात किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारी बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
या चक्रीवादळाचा परिणाम पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मोठी हानी होण्याची शक्यता असून हवामान विभागाने प्रशासनाला आवश्यक ती पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागात तसेच मिठागारांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. कच्ची घरे, खांब, झाडे कोसळण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात जालना ९२, पुणे ५३़३, लोहगाव ६३, संगमनेर ४४, शिरुर कासार ३०, शेगाव २५, बीड १५, औरंगाबाद ३, सातारा ३ मिमी पावसाची नोंद झाली होती़ सोमवारी सायंकाळपर्यंत पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे.
उत्तर महाराष्ट्राला पावसाचा इशारा
इशारा : ५ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता़ ६ नोव्हेंबर रोजीकोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ७ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.