आॅनलाइन लोकमतकोची, दि. 27 - एखाद्या विख्यात कंपनीने आपल्या डिझायनर साड्यांच्या जाहिरातवजा कॅलेंडरवर ट्रान्सजेंडर्सना (तृतीयपंथी) मॉडेल म्हणून निवडल्याची स्वागतार्ह सुरुवात केरळमध्ये घडली आहे. शर्मिला या त्या कंपनीच्या अधिकारी महिलेने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आम्ही साड्यांच्या या कलेक्शनला नाव दिले आहे, मझाविल म्हणजे इंद्रधनुष्य. कारण हा इंद्रधनुष्यी झेंडा त्यांचे जगभरात प्रतिनिधित्व करतो. भारतात तृतीयपंथीयांना हीन भावनेने पाहिले जाते. त्यांची कुचेष्टा केली जाते, त्यांना टाळले जाते. अशा पार्श्वभूमीवर शर्मिला यांनी ट्रान्सजेंडर्सची केलेली निवड ही विशेष ठरते. कॅलेंडरसाठी फोटोसेशन केलेल्या या दोन मॉडेल्स आहेत, माया मेनन आणि गोवरी सावित्री. विशेष म्हणजे त्यांना मॉडेलिंगचा काहीही अनुभव नाही. या अनोख्या प्रयोगाची सुरुवात झाली एक सामाजिक संस्था, करिलामुळे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शर्मिला पुढे सांगतात, हँडलूम साड्यांच्या नव्या कलेक्शनला कसे सादर करावे याचा विचार करत असतानाच माझी नजर राज्य सरकारने फेसबुकवर दिलेल्या एका पोस्टवर पडली. त्यात ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्याला नवीन अर्थ देण्याबाबत म्हटले होते. सरकार जर समाजासाठी एवढे काही करीत असेल तर मलाही त्यात हातभार लावला पाहिजे या हेतूने मी मग पुढचे नियोजन केले. कॅलेंडरसाठी निवडलेल्या या दोन्ही मॉडेल्स पदवीधर आहेत, मात्र त्यांच्या ट्रान्सजेंडर्स असण्यामुळे त्यांना कुठेही नोकरी मिळाली नव्हती. त्यांच्यासाठी मॉडेलिंग हे एक नवे दालन आता खुले झाले आहे. या माध्यमातून समाज त्यांना आदरपूर्वक स्वीकारेल व त्यांच्या आयुष्याला एक नवा आयाम मिळेल, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केला आहे.
मॉडेलिंगच्या क्षेत्रात ट्रान्सजेंडर्सचे पदार्पण
By admin | Published: June 27, 2017 6:24 PM