नवी दिल्ली- गेल्या काही महिन्यांमध्ये इमर्जन्सी लँडिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४६० वेळा विमानात बिघाड झाल्याच्या घटना गेल्या वर्षी भारतात घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये विमान प्रवासाबद्दल एक प्रकारची भीती पसरु लागली आहे. विमान प्रवास खरेच धोकादायक झाला आहे का? तांत्रिक बिघाडांचे प्रकार काशामुळे वाढले आहेत?, जाणून घ्या, या नेमके काय कारण आहे.
विमानामध्ये जे अभियांत्रिकी बिघाड झाले, त्या पार्श्वभूमीवर सर्व विमान कंपन्यांनी अशा घटनांचे विशेष ऑडिटिंग करावे, असा आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिला आहे. विमान कंपन्यांकडील उपलब्ध मनुष्यबळ, सुविधा, उपकरणे यांची तपासणीही व्हावी, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे.
इमर्जन्सी लँडिंगची प्रकरणे का वाढली?
जगभरात लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. विमानांचे सुटे भाग उपलब्ध होण्यास अडचण होत आहे. काही विमाने विमानतळांवरील हँगरमध्ये उभी करुन ठेवण्यात आली आहेत.
पायलटचे कौतुक-
विमानाने उड्डाण केल्यानंतर वा जमिनीवर असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला, तर त्यावेळी पायलट प्रसंगावधान राखून व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन निर्णय घेतात. काही वेळेस विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करतात, अशा पायलटचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे संचालक अरुणकुमार यांनी कौतुक केले आहे.