नवी दिल्ली : हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे. पूर्वी जहाजाने जेद्दापर्यंत जाऊन भारतीय यात्रेकरू हज करत असत. परंतु गेली अनेक वर्षे यात्रेकरूंना फक्त विमानानेच पाठविले जात आहे.यंदाच्या हज यात्रेसंबंधी भारत व सौदी अरबस्तान दरम्यानच्या करारावर मक्का येथे स्वाक्ष-या केल्यानंतर केंद्रीय अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिल्याचे एका सरकारी निवेदनात नमूद केले गेले.पुन्हा समुद्रमार्गाने हज यात्रा कधी व कशा प्रकारे सुरू केली जाऊ शकेल याचा तपशील दोन्ही देश आपसात चर्चा करून नजिकच्या भविष्यात ठरवतील, असेही नक्वी म्हणाले.जहाजप्रवास २-३ दिवसांचा समुद्राने हज यात्रेसाठी जायचे, तर त्यासाठी पूर्वी १२ ते १५ दिवस लागायचे. परंतु आताची जहाज आधुनिक आहेत आणि त्यातून एकाच वेळी ४ हजार ते ५ हजार यात्रेकरून प्रवास करू शकतात. त्यांचा वेगही खूप असतो.त्यामुळे दोन ते तीन दिवसांतच २३०० नॉटीकल मैलाचे अंतर पार केले जाऊ शकते, असेही नक्वी यांनी सांगितले. मात्र जेद्दाह येथे उतरल्यानंतर तेथून मक्क्यापर्यंतचा प्रवास आणखी ४ तासांचा आहे.खर्च कमी लागेलया निर्णयामुळे हज यात्रेचा खर्च बराच कमी होईल व गरीब मुस्लिमांनाही हजला जाणे शक्य होईल, असेही नक्वी म्हणाले.
भारतातून पुन्हा समुद्रमार्गे हज यात्रा शक्य, अल्पसंख्य व्यवहारमंत्र्यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:47 PM