लोकमत ऑनलाइन
बंगळुरू, दि. 26- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. सगळीकडेच भाजपच्या प्रत्येक नेत्याकडून तसंच कार्यकर्त्यांकडून आजचा दिवस साजरा केला जातो आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये मोदींचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतो आहे. या सगळ्या गोष्टी होत असताना बंगळुरूमधील एक रिक्षावाल्याचं पंतप्रधान मोदींवर असलेलं प्रेम राजकीय वर्तुळात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.
मंगळुरूमध्ये राहणारे 44 वर्षीय सतीश प्रभु पंतप्रधान मोदींचे मोठे चाहते आहेत. सतीश प्रभु मंगळुरूमध्ये रिक्षा चालवतात. मोदी सरकार चौथ्या वर्षात पदार्पण करत असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी प्रभु यांनी त्यांच्या रिक्षेतून प्रवास करणाऱ्यांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. शुक्रवारपासून पुढचे चार दिवस प्रभु यांच्या रिक्षेतून प्रवास करण्यासाठी फक्त एक रूपया भाडं आकारलं जाणार आहे. एक रूपयामध्ये प्रवासी 5 किलोमीटरपर्यत प्रवास करू शकतात. ही ऑफर सांगणार पोस्टर प्रभु यांनी त्यांच्या रिक्षेवर लावलं आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी अनेक महत्त्वाची आणि चांगली काम करत आहेत, मोदी सरकारचे आपल्याला आभार मानता यावेत, यासाठी ही ऑफर सुरू केली आहे. याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होइल तसंच रिक्षेसाठी एक रूपया द्यावा लागल्याने
प्रवाशांच्या पैशांची काही प्रमाणात बचत होइल, असं सतीश प्रभु यांनी सांगितलं आहे.
भाजपचे नेते चक्रवर्थी सुलिबेले यांनी सतीश प्रभु यांच्या पोस्टरचा फोटो ट्विट केला आहे. त्यांच्या ट्विटनंतर भाजप वर्तुळात याबद्दलची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे.
मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं होतं तेव्हासुद्धा सतीश प्रभु यांनी त्यांच्या रिक्षेच्या भाड्यामध्ये कपात केली होती. त्यावेळी 150 प्रवाशांना त्या ऑफरचा फायदा झाला होता.