ऑनलाइन लोकमत
रांची, दि.11- एअर एशियाच्या विमानात एका प्रवाशाने रांची विमानतळावर विमान लँड होण्याच्याआधीच विमानाचा एक्झिट गेट उघडल्याची घटना घडली आहे. रांची विमानतळावर सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्या प्रवाशाच्या अशा वागणुकीमुळे इतर प्रवाशांमध्ये काहीवेळेसाठी भीतीचं वातावरण पसरलं होतं. प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता पण मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुखरुप विमानतळावर उतरले.
आणखी वाचा
अफताब अहमद असं या प्रवाशाचं नाव आहे. विमानातील काही प्रवासी एक्झिट गेट उघडण्यापासून अफताबला थांबविण्यासाठी गेले होते. पण त्याने प्रवाशांना न जुमानता दरवाजा उघडला. यावेळी झालेल्या झटापटीत काही प्रवासी जखमी झाले आहेत. रांचीचा रहिवासी असणाऱ्या अहमदला विमान लँड झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. एअर एशियाचं विमान सोमवारी रात्री 9 वाजून 50 मिनीटांनी दिल्लीवरून कोलकाताकडे निघालं होतं. वाया रांची असा विमानाचा मार्ग होता. अफताब हा प्रवासी विमानात 24-A क्रमांकाच्या सीटवर बसला होता. त्यावेळी त्याने अचानक हा संपूर्ण प्रकार केला आहे. अफताब अहमद या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. नेमकं त्याने असं का केलं? याचं कारण अजून अस्पष्ट आहे.
विमान प्रवासादरम्यान प्रवाशांनी गैरवर्तन केल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. एप्रिल महिन्यात विमान कर्मऱ्यांना एका प्रवाशाला सीटवर बांधून ठेवण्याची वेळ आली होती. दुबई ते दिल्ली प्रवास करताना तो प्रवासी अचानक हिंसक झाल्याने त्याला सीटवर बांधून ठेवण्यात आलं होतं. मे महिन्यामध्ये एका रशियन प्रवाशाकडून विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला दिल्ली विमानतळावर विमान लँड होताच पोलिसांच्या हवाली करण्यात आलं होतं.तसंच नंतर दंडही आकारण्यात आला होता.