भारतातील रेल्वेचं जाळ जगात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय रेल्वेचा विस्तार झाला असून प्रवाशांच्या सेवेत प्रत्येक राज्यात रेल्वे धावते. मात्र, हीच भारतीय रेल्वे प्रवाशांना घेऊन विदेशातही जाते. देशात काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते सिक्कीमपर्यंतच्या मार्गावर रेल्वेतून भारतभ्रमंती करता येते. पण, भारतातून शेजारच्या देशातही रेल्वेने प्रवास करता येतो. भारतातून तुम्हाला नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तानला जाण्यासाठी थेट रेल्वे उपलब्ध आहे.
भारत आणि नेपाळ या दोन देशांना जोडत एप्रिल २०२२ मध्ये भारत ते नेपाळ रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. तर, भारतातून बांग्लादेशला जाण्यासाठीही अनेक रेल्वे धावतात. मात्र, पाकिस्तानला जाण्यासाठी केवळ दोनच रेल्वे आहेत, त्यावरही भारत सरकारने तुर्तात बंदी आणली आहे. त्यामुळे, भारतातून सध्या नेपाळ आणि बांग्लादेश या दोनच देशांत रेल्वे मार्गाने जाता येते.
नेपाळसाठी
भारतातून नेपाळसाठी २ एप्रिल २०२२ रोजी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. जयनगर ते जनकपूर ही कुर्था रेल्वे मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करण्यात आली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात उभारण्यात येत असलेल्या जयनगर-बिजलपुरा-बर्दीबास रेल्वे योजनेच्या पहिल्या टप्प्यात जयनगर-जनकपुर/कुर्था रेलखंड जयनगर-बिजलपुरा-बर्दीबास (69.08 किमी) रेल्वे योजनेचा एक भाग आहे. या प्रवासात भारतीय नागरिकांना ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. नेपाळ जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नाही. त्यासाठी, रेल्वे स्टेशनहून तिकीट काढता येते.
जयनगर येथून सकाळी 8:15 आणि दुपारी 2:45 वाजता जनकपूरसाठी ट्रेन रवाना होते. जयनगर येथून जनकपूरला जाण्यासाठी 1 तास 20 मिनटांचा अवधी लागतो. तर, जनकपूर येथून जयनगरला येण्यासाठी 1 तास 40 मिनिटांचा अवधी लागतो. जनकपूर येथून सकाळी 11.05 वाजता आणि सायंकाळी 5.35 वाजता जयनगरसाठी ट्रेन सुटते.
भारत-बांग्लादेशसाठी ट्रेन
मैत्री एक्सप्रेस - भारत आणि बांग्लादेश मार्गावर ही ट्रेन धावते, पश्चिम बंगालच्या कोलकाता स्थानकातून बांग्लादेशच्या ढाकापर्यंत ही ट्रेन धावते. आठवड्यातून 4 वेळा या ट्रेनचं वेळापत्रक ठेवण्यात आलं आहे.
बंधन एक्सप्रेस- ही ट्रेन 2017 मध्ये सुरू झाली. जी कोलकाता ते बांग्लादेशच्या खुलनापर्यंत धावते. यापूर्वीही ही ट्रेन सुरू होती, मात्र, 1965 मध्ये ही सेवा बंद करण्यात आली होती.
मिताली एक्सप्रेस - ही ट्रेन भारताच्या जलपाईगुड़ी आणि सिलीगुड़ी ते बांग्लादेशच्या ढाकापर्यंत धावते. या ट्रेनची सेवा आठवड्यात एकवेळ अशी देण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवासात 513 किमीचे अंतर पार केले जाते.
या ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिजी किंवा पासपोर्टची गरज नाही. रेल्वे स्टेशनहून तुम्हाला तिकीट मिळू शकते. ओळखपत्र आणि काही कागदपत्रे तपासणी होताच तुम्हाला प्रवास करता येईल.
भारत ते पाकिस्तान ट्रेन
भारत आणि पाकिस्तान देशांत दोन रेल्वे सेवा आहेत. त्यापैकी, एक ट्रेन समझौता एक्सप्रेस, तर दुसरी थार एक्सप्रेस. समझौता एक्सप्रेस आठवड्यात दोनवेळा राजधानी दिल्ली, अटारी येथून पाकिस्तानच्या लाहोरपर्यंत धावते. तर, थार एक्सप्रेस भगत की कोठी (जयपूर,राजस्थान) येथून कराचीपर्यंत धावते. दरम्यान, सध्या दोन्ही रेल्वेसेवा बंद आहेत. ९ ऑगस्ट २०१९ पासून दोन्ही देशातील वाढता तणाव लक्षात घेऊन ही प्रवास सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये रेल्वेने जाण्यासाठी देखील अगोदर व्हिसा आणि पासपोर्ट बंधनकारक आहे.