तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा दावा आणि आरोपांवरून राजकारण तापताना दिसत आहे. टीडीपीनंतर आता भारतीय जनता पक्षाचे नेते बंदी संजय कुमार यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, "हिंदूंसोबत झालेल्या मोठ्या विश्वासघातासाठी देव कधीही क्षमा करणार नाही."
बंदी संजय कुमार यांनी X वर लिहिले आहे, "लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वाप करणे, तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी यांची पूजा करणाऱ्या हिंदूंच्या आस्थेसोबत करण्यात आलेला मोठा विश्वासघात आहे. इतर समुदायाच्या लोकांना आणि नास्तिकांना कर्मचारी म्हणून आणि टीटीडी बोर्डात सहभागी केल्याने भ्रष्टाचार आणि हिंदूंच्या आस्थेप्रति अनादर वाढेल, अशी चिंता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती." बंदी संजय कुमार यांची मोठी मागणी - बंदी संजय कुमार यांनी पुढे लिहिले आहे की, "सध्याच्या आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल. तसेच, या प्रकरणातील दोषी व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी. याशिवाय, तिरूमलाच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यात यावे," अशी आमची मागणी आहे.
गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. काय आहे लॅब अहवाल? -अहवालानुसार, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते.