नवी दिल्ली : देशद्रोहासंदर्भात दिल्ली पोलिसांनी शनिवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी आशुतोष याची कसून चौकशी केली. पोलिसांनी समन्स जारी केल्यानंतर आशुतोष स्वत: पोलिसांसमक्ष हजर झाला. दरम्यान, आपणास कोर्टाच्या परिसरात आणि आतमध्ये काळ्या कोटातील काही लोकांनी मारहाण केली आणि ती होत असताना पोलीस मख्खपणे उभे होते, असा दावा कन्हैया कुमार याने केला आहे. आपणास कशी मारहाण करण्यात आली, याची माहिती देणारा कन्हैया याचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात त्याने मारहाणीची माहिती दिली आहे.आशुतोष हा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया याचा पूर्वपदस्थ आहे. रविवारी रात्री जे पाच विद्यार्थी जेएनयूमध्ये आले होते, त्यात आशुतोषचाही समावेश होता. या पाचपैकी उमर खालीद व अनिर्बन भट्टाचार्य या दोघांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. आशुतोषला शुक्रवारी समन्स मिळाले. अन्य दोन विद्यार्थी रामा नागा व अनंत कुमार यांच्या नावाने अद्याप समन्स निघालेले नाही. स्वतंत्र काश्मीरसमर्थक पोस्टर्सदिल्लीच्या जेएनयू परिसरात पुन्हा स्वतंत्र काश्मीरसमर्थक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या वादग्रस्त पोस्टर्समध्ये काश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार मागण्यात आला आहे, तसेच भारताला ‘विविध नागरिकांचे कारागृह’ असे संबोधण्यात आले आहे. शिवाय एका पोस्टरमध्ये हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूचा निषेध करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस या पोस्टर्ससंदर्भात एका दुकानदाराची कसून चौकशी करीत आहेत. याच दुकानातून या पोस्टर्सची फोटोकॉपी काढण्यात आल्याचा संशय आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)