बंगळुरू - आरोग्य हीच संपत्ती हे आपण ऐकतो, वाचतो पण कोरोनामुळे आरोग्य हीच धनसंपदा असल्याच सिद्ध झालंय. कारण, रुग्णालयापासून दूर राहण्यासाठी माणसाने नको नको ते प्रयोग केले. कोरोना आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून, घरातून बाहेर न पडण्यापासून ते जवळच्या नातलगांच्या गाठीभेटीही टाळल्या, मित्रांनाही काही दिवसांसाठी दूर लोटल्याचं आपण पाहिलंय. जगदुनिया कशी ठप्प झाली होती. तर, कोरोना झाल्यानंतरही उपचार घेऊन कधी घरी येतोय, अशीच सर्वांची अवस्था झाली होती. रुग्णालयात कुणाला जास्त काळ थांबू वाटत असेल. मात्र, बंगळुरुतील एक रुग्ण तब्बल गेल्या 5 वर्षांपासून रुग्णलयात दाखल आहे.
बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात गेल्या 5 वर्षांपासून एका महिलेवर उपचार सुरु आहेत. पूनम असे या पीडित महिलेचं नाव असून पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर 5 वर्षांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनिपाल रुग्णालयात सर्जरी करताना पूनम कोमामध्ये गेली. त्यानंतर, तिने बेडवरच अंग टाकले. आता खूप कठिणाईने ती बोलू किंवा हलू शकते. त्यामुळे, 5 वर्षांपूर्वीच डॉक्टरांनी पूनमला घरी घेऊन जाण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला होता. मात्र, पूनम पूर्वीप्रमाणे ठीक होईल, अशी आशा तिच्या नातेवाईकांना होती. आता, रुग्णालयाच्या दुर्लक्षितपणामुळेच पूनमची ही दयनीय अवस्था झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अद्यापही रुग्णालयात पूनमवर उपचार सुरू असून तिच्या उपचारासाठी आत्तापर्यंत 6 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यापैकी, पूनमच्या कुटुंबीयांनी 1.34 कोटी रुपये बिल भरले असून उर्वरीत रक्कम देणे बाकी आहे.
पूनम लवकरात लवकर बरी व्हावी, याचसाठी नातेवाईकांसह रुग्णायलातील स्टाफही प्रार्थना करत आहे.