कोरोना काळात देशवासियांना माहिती देण्याची, सावध राहण्याचे आणि कोणती कोणती काळजी घ्यावी याची दररोज माहिती देणारे डॉक्टर आज सेवानिवृत्त होत आहेत. एम्सचे संचालक (AIIMS Director) रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) आज रिटायर होत आहेत. कोरोना काळात मोठी जबाबदारी पेलणाऱ्या गुलेरिया यांच्याविषयी जाणून घेऊया.
गुलेरिया यांनी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटल (IGMC) मधून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. यानंतर ते देशातील सर्वात मोठ्या मेडिकल संस्थेच्या संचालक पदावर पोहोचले. गुलेरिया यांची ओळख आपल्याला कोरोना काळातच झाली. दररोज बातम्यांमध्ये त्यांचे नाव यायला लागले. परंतू, ही त्यांची ओळख नव्हती. देशातील सर्वात मोठे पल्मोनोलॉजिस्ट (Pulmonologist) च्या पंक्तीत त्यांचे नाव आघाडीवर घेतले जायचे.
शिमल्यातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते चंडीगड गाठत पोस्ट ग्रैजुएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च (PGIMER) मधून एमडी झाले. त्यानंतर त्यांनी पल्मोनरी मेडिसिन मध्ये डीएमची पदवी घेतली. १९९२ मध्ये ते एम्समध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांनी एकेक पदे मिळवत आपल्या हुशारीचा आणि वैद्यकीय अनुभवाचा एम्सला फायदा करून दिला.
गुलेरीया यांना २०१७ मध्ये एम्सचे संचालक नियुक्त करण्यात आले. गुलेरिया यांचे वय ६२ वर्षे आहे, आणखी तीन वर्षे ते एम्सला सेवा देऊ शकतात. ते दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे खासगी फिजिशिअन देखील होते. गुलेरिया यांनी २६८ रिसर्च आर्टिकल लिहीली आहेत. केंद्राने त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. गुलेरिया यांचे वडील जगदेव सिंह गुलेरिया एम्सचे डीन देखील होते.
डॉ गुलेरिया यांनी श्वसन स्नायू कार्य, फुफ्फुसाचा कर्करोग, दमा, COPD मध्ये योगदान दिले आहे आणि 400 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये संशोधन प्रकाशित केले आहे. असे हे देशातील नामवंत डॉक्टर आज सेवानिवृत्त होत आहेत.