नवी दिल्ली : आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकासाठी सर्वच पक्षांनी आपापल्या बलाढ्य उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. यामध्ये काही निष्ठावंत, बंडखोर आणि करोडपती उमेदवार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव राज्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.
सरगुजा संस्थानाचे त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव राजा आहेत. त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांची लोकप्रियता इतकी आहे की त्यांना येथील लोक प्रेमाने 'टीएस बाबा' म्हणतात. छत्तीसगडमधील अंबिकापूर विधानसभा मतदारसंघाचे त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव सध्या आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले होते. त्यांची लोकप्रियता पाहता, त्यांना पुन्हा काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.
त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 500 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. या संपत्तीवरुन असे लक्षात येते की, त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव राज्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांनी दाखविलेल्या संपत्तीचे आकडे असे सांगतात की, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि मिजोरम या राज्यांच्या सर्व आमदारांची संपत्ती आहे. तेवढी संपत्ती त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांच्याकडे आहे.
2013 मध्ये त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांची संपत्ती जवळपास 551 कोटी होती. मात्र, आता त्यांची संपत्ती 504 कोटींच्याजवळ आहे. अंबिकापूरमधील अनेक घरे, सरकारी इमारती, प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या धर्मशाळा, रुग्णालये, शाळा आणि शेती यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा मालकी हक्क आहे.
दरम्यान, अंबिकापूरमध्ये त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांच्याविरोधात भाजपाचे अनुराग सिंहदेव निवडणुक लढवत आहेत. गेल्या दोन निवडणुकीत त्रिभुवनेश्वर शरण सिंहदेव यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा त्यांचा निर्धार आहे.