राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशाची श्रद्धांजली
By admin | Published: January 30, 2015 9:11 PM
नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ६७ व्या स्मृतीदिनी देशभरात स्वातंत्र्य लढ्यातील या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनीसुद्धा बापूंच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.
नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ६७ व्या स्मृतीदिनी देशभरात स्वातंत्र्य लढ्यातील या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजघाटावर जाऊन गांधीजींच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनीसुद्धा बापूंच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेते गांधीजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. त्यांच्या स्मृतीत दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राज्यमंत्री राव इंद्रजीतसिंग, तीनही सेनांचे प्रमुख एअर चिफ मार्शल अरुप राहा, ॲडमिरल रॉबिन धवन आणि जनरल दलबीरसिंग यांनीही राष्ट्रपित्यास आदरांजली वाहिली. यावेळी तोफांची सलामी देण्यात आली. पूज्य बापूंना माझी श्रद्धांजली,असे टिष्ट्वट पंतप्रधान मोदी यांनी केले. आजच्या या हुतात्मा दिनी मी देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहिदांना आदरांजली वाहतो. त्यांचे शौर्य आणि साहस देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देईल,असे भावोद्गारही त्यांनी व्यक्त केले.गांधी पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर सर्वधर्म प्रार्थना झाली. केंद्रात मंत्री असलेले गायक बाबुल सुप्रियो यांनी बंगाली भजन गायिले. विविध क्षेत्रातील असंख्य लोक बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर पोहोचले होते. याशिवाय देशाच्या प्रत्येक शहरात आणि गावात विविध कार्यक्रमांच्या माध्यमाने या महान नेत्याचे स्मरण करण्यात आले. (वृत्तसंस्था)