ऑनलाइन लोकमत
दादरी, दि. ७ - संपूर्ण देशभरात गाजलेल्या मोहम्मद अखलाख हत्या प्रकरणातील एक आरोपी रवीन सिसोदीयाच्या मृत्यूवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. बिसारा गावात रवीनचा मृतदेह ठेवण्यात आलेल्या शीत शवपेटीवर तिरंगा झेंडा लावण्यात आला आहे तसेच सिसोदीया कुटुंबियांनी रवीनवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.
उत्तरप्रदेश सरकार नुकसान भरपाईपोटी १ कोटी रुपयाची रक्कम जाहीर करत नाही तो पर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका सिसोदीया कुटुंबाने घेतली आहे. याशिवाय रवीनच्या मृत्यूची सीबीआय चौकशी, ग्रेटर नोएडातील तुरुंग अधिका-यांवर कारवाई आणि अखलाखचा भाऊ जान मोहम्मदला गोवंश हत्येच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी केली आहे.
मंगळवारी संध्याकाळी दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात किडनी फेल झाल्यामुळे २१ वर्षाच्या रावीनचा मृत्यू झाला. गुरुवारी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी बिसारा गावाला भेट देऊन रवीनच्या कुटुंबियांची भेट घेतली.
रवीनच्या मृत्यूनंतर गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. राज्य सरकार रवीनच्या कुटुंबाला १० लाखांची मदत देण्यास तयार आहे. पण रवीनच्या कुटुंबियांनी १ कोटीची मागणी केली आहे. घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरुन मागच्यावर्षी जमावाने केलेल्या मारहाणीत मोहम्मद अखलाखचा मृत्यू झाला होता. या हत्या प्रकरणातील १८ आरोपींपैकी रवीन एक होता.