चंडीगड - देशाच्या सीमारेषेवरील राजौरी येथे दहशतवाद्यांच्या चकमकीत गतवर्षी रक्षाबंधन दिनीच निशांत मलिक शहीद झाले होते. ११ ऑगस्ट २०२२ रोजी मलिक कुटुंबातील सुपुत्रला वीरमरण आलं. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज भावाला शहीद होऊन एक वर्ष झाले. त्यामुळे, शहीद भावाच्या आठवणी जपत निशांत यांच्या तिन्ही बहिणी आई आणि वडिलांसह ढंडेरी गावातील सरकारी शाळेत पोहोचल्या. जेथे असलेल्या शहीद भावाच्या स्मारकाला तिरंग्याची राखी बांधत कपाळी टिळा लावला. हा भाऊक क्षण नकळत अश्रूंचा साक्षीदार बनला.
हांसी तालुक्यातील ढंढेरी गावात उभारण्यात आलेल्या शहीद भावाच्या स्मारकावर जाऊन तिन्ही बहिणींनी तिरंग्याची राखी बांधली. यावेळी, बहिणींच्या डोळ्यात अश्रू तरळले. आम्हाला प्रत्येक जन्मात निशांतच भाऊ मिळू दे, अशी आर्त प्रार्थनाही या बहिणींनी देवाकडे केली. एकुलत्या एक भावाला गमावल्याचं दु:ख तिन्ही बहिणींना आणि शहीदाच्या माता-पित्याला आहे.
दरम्यान, गतवर्षी ११ ऑगस्ट २०२२ रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीच दहशतवाद्यांशी लढताना निशांत मलिक शहीद झाले होते. राजौरी येथे निशांत यांनी दशतवाद्यांनाही कंठस्नान घातले होते. मात्र, वयाच्या २१ व्या वर्षी ते शहीद झाले. किरण, ज्योती व नीरज या तीन बहिणींचा हा लहान भाऊ होता, जो देशासाठी शहीद झाला. या भावाची आठवण ठेवत या तिन्ही बहिणींनी वडिल जयबीरसिंह मलिक आणि आई राजबाल यांच्यासमवेत शहीद स्मारकाला भेट दिली.
निशांतने आपल्या लहान बहिणीसाठी गाडी बुक केली होती. नोव्हेंबर महिन्यात बहिणीचं लग्न होणार होतं. निशांत, बहिणीला लग्नाचं गिफ्ट म्हणून गाडी देणार होता. बहिण नीरजचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, नियतीच्या मनात वेगळंच होतं. ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमेदिवशीच हा वीर भाऊ शहीद झाला.