वेल्लोर, दि. 12 - तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने मेडिकल ऑफिसरला आठवडाभर तिरंगा फडकावण्याची शिक्षा सुनावली आहे. अंबूर येथील सरकारी रुग्णालयामधील डॉक्टर ए केन्नेडी यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मद्रास उच्च न्यायालायाने डॉक्टर ए केन्नेडी यांना आठवडाभर तिरंगा फडकावण्याच्या अटीखाली जामीन दिला आहे.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मेडिकल ऑफिसर डॉक्टर ए केन्नेडी यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर डॉक्टर ए केन्नेडी यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता.
15 ऑगस्टच्या कार्यक्रमात जेव्हा तिरंगा फडकावला जात होता आणि राष्ट्रगीत गायले जात होते, तेव्हा डॉक्टर ए केन्नेडी फोनवर बोलत होते. डॉक्टर ए केन्नेडी यांचा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. डॉक्टर ए केन्नेडी यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत माजी नगसेवक सुरेश बाबू यांनी अंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंर डॉक्टर ए केन्नेडी सुट्टीवर गेले होते. अखेर त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात आत्मसमर्पण करत जामिनासाठी अर्ज केला होता.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी एन प्रकाश यांनी जामीन स्विकारताना अट ठेवली आहे. अटीनुसार डॉक्टर ए केन्नेडी यांना दरदिवशी सकाळी 10 वाजता अंबूर सरकारी रुग्णालयात तिरंगा फडकावयचा असून, तिरंग्याला सलाम करत राष्ट्रगीत गायचं आहे. डॉक्टर ए केन्नेडी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतात की नाही यावर नजर ठेवण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिसांनी आदेशाचं पालन होत आहे की नाही याची माहिती न्यायालयाला द्यायची आहे.
डॉक्टर ए केन्नेडी यांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मंगळवारी पोलिसांच्या उपस्थितीत तिरंगा फडकावला आहे.